28.4.11

मॅनेज (ME )

आपल्याकडे भलेही स्विस बँकेत टाकावे एवढे पैसे नसतील,                 
पण जेवढे आहेत ते तरी व्यवस्थित वापरायला शिकलं पाहिजे ना?
नाही तर पैसा येतो आणि जातो, आपला खिसाच रिकामा..!
ऑनलाईन मनी मॅनेजर्सची मदत घेऊन पै-पै चा हिशेब
ठेवता येऊ शकतो..!
                                                         

१. कॉलेजात शिकणाऱ्या शैलेशची डायरी

जानेवारी २०११ :
मिळालेला पॉकेटमनी : १२०० रुपये
झालेला खर्च :
पेट्रोल : ३५० रुपये
सिनेमा : २०० रुपये
स्नॅक्स : १५० रुपये
मोबाईल रिचार्ज : २०० रुपये
इतर : २००
---------------------------
एकूण खर्च : रुपये ११००
शिल्लक : रुपये १००


२. सॉफ्टवेअर प्रोफेशनल केदारची डायरी

जानेवारी २०११

रिलायन्स फ्रेश : ३५५ रुपये
इनॉरबिट मॉल (कपडे) : १६९० रुपये
सिनेमा: ४५० रुपये
स्नॅक्स आणि डिनर : ३७५ रुपये
पेट्रोल: १५०० रुपये
क्रेडिट कार्ड पेमेंट: ८००० रुपये
इन्शुरन्स प्रीमियम: ५००० रुपये
इतर: ५००० रुपये
---------------------------
एकूण: २२३७० रुपये

जानेवारीत सुरू केलेला हा उपक्रम फेब्रुवारीत बारगळतो आणि मग थेट पुढच्या वर्षी डिसेंबरातच पुन्हा जाग येते. तोपर्यंत शैलेशसारख्यांना महिनाअखेरीच्या तंगीची आणि केदारसारख्यांना इन्कम टॅक्सची झळ पोचलेली असते. आता या वर्षापासून व्यवस्थित हिशेब ठेवायचा, असा दृढनिश्चय आपण करतो. तो जेमतेम महिनाभर टिकतो. यात आपला दोष नाही. शहरात राहून नोकरी करणाऱ्यांना दोन-तीन बँक अकाऊंटस, एखादे-दुसरे क्रेडिट कार्ड, घराचे किंवा गाडीचे हप्ते, इन्शुरन्स प्रीमियम, शेअर्स, इतर ठिकाणी केलेली सेव्हिंग्ज, महिन्याचा खर्च हे सगळं कागदावर उतरवणं आणि त्याचा हिशेब राखणं हे अत्यंत अवघड काम आहे. कधी कोणत्या क्रेडिट कार्डाचे पैसे भरले आणि कधी मॉलमधून कपडे खरेदी केले, हे दोन-तीन महिन्यांनंतर विचारले तर लक्षातही येणार नाही.
अशावेळी आपण ऑनलाईन मनी मॅनेजर्सची मदत घेऊ शकतो. आजच्या लेखात अशाच काही देशी-विदेशी मनी मॅनेजर्सबद्दल जाणून घेऊयात.

१. इलेक्ट्रिक चेकबुक :
अमेरिकन लोकांना समोर ठेवून तयार केलेली ही ऑनलाईन सेवा डॉलरचे चिन्ह वगळले तर कोणत्याही देशातली व्यक्ती वापरू शकते. यावर रजिस्टर झाल्यानंतर सर्वप्रथम तुमचे अकाऊंट तयार करावे लागते. उदा. तुम्ही तुमच्या दोन बँकांसाठी दोन वेगळे अकाऊंटस तयार करू शकता. महिन्याच्या सुरवातील जमा होणारी रक्कम एंटर केल्यानंतर ज्या खर्चाच्या बाबी आहेत, म्हणजे क्रेडिट कार्ड, मोबाईल बिल, लाईट बिल वगैरे माहिती भरत जावी लागते. प्रत्येक व्यवहारानंतर तुमच्या जमा-खर्चाचा हिशेब तुमच्या समोर येत जाईल. आता कुठले बिल कोणत्या अकाऊंटमधून, किती तारखेला भरले याचाही ट्रॅक ठेवता येईल आणि असलेल्या पैशांचे योग्य व्यवस्थापनही करता येईल. महिनाअखेरीस बसणाऱ्या शॉकपासून वाचायचे असेल तर इलेक्ट्रिक चेकबुक वापरून पाहायलाच पाहिजे.
(http://electriccheckbook.com/ )

२. बक्स्फर :
इलेक्ट्रिक चेकबुक ही सेवा केदारासारख्य नोकरदार व्यक्तींना अधिक उपयोगी ठरते. शैलेशसारख्या कॉलेजगोअर्सनी बक्स्फर ही सेवा वापरायला हरकत नाही. विद्यार्थीदशेत महिनाअखेरीस उधारी घेण्यावाचून गत्यंतर नसते. त्यामुळे आज याच्याकडून १०० रुपये घे, उद्या त्याच्याकडून ३० रुपये घे, असे प्रकार नित्याचे असतात. काही जण विश्वासाने पैसे देतात आणि काही जण ते इमाने-इतबारे परतही देतात. पण सगळेच एवढे नशीबवान नसतात. सख्ख्या मित्राला, तू पैसे बुडवलेस, असं कसं म्हणणार? अशा भिडस्त स्वभावाचा सख्खा मित्र गैरफायदा घेतो आणि आपले पैसे कायमचे बुडतात. अशा वेळी तुम्ही बक्स्फर वापरून तुमचे सगळे हिशेब चोख ठेवू शकता.
(http://www.buxfer.com/ )

३. अर्थमनी
अर्थमनी ही मनी मॅनेजमेंटसाठी तयार झालेले बहुधा पहिलेच ऑनलाईन पोर्टल आहे. गेल्या वर्षी सुरू झालेया या पोर्टलमध्ये पर्सनल फायनान्स अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवांचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. यात बँक अकाऊंटसह शेअर ट्रेडिंग अकाऊंट, विविध विमा योजना, विविध बचत योजना, म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड आदी सर्वांचे व्यवस्थापन करता येऊ शकते. रजिस्टर केल्यानंतर तुम्ही ही सेवा मोफत वापरू शकता.
(http://www.arthamoney.com )

४. पैसागेट
पैसा गेट या आणखी एका भारतीय वेबसाईटनं मनी मॅनेजमेंट अगदीच सोपं करून टाकलं आहे. यावर रजिस्टर झाल्यानंतर दर महिन्याच्या सुरवातीला बजेट एंटर करायचे. त्यानंतर केवळ एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही तुमचे अकाऊंट मॅनेज करू शकता. उदा. एखाद्या ठिकाणी तुम्ही कॉफी घेतली की पैसागेटला कॉफी ३० रुपये असा एसएमएस करायचा. पैसागेट हा खर्च तुमच्या अकाऊंटमध्ये मांडून शिल्लक रक्कम किती आहे हे तुम्हाला कळवेल. ही सेवा तीस दिवसांसाठी मोफत वापरता येते. त्यानंतर विविध प्लॅन्समधून तुम्ही प्लॅन निवडू शकाल.
(http://www.paisagate.com/ )

५. मॅनेज मी :
मॅनेज मी या आणखी एका भारतीय ऑनलाईन मनी मॅनेजमेंट पोर्टलमध्ये वर उल्लेख केलेल्या सर्व सुविधा मिळतात. याशिवाय तुम्ही यात एकाच वेळी विविध देशांची चलनं वापरू शकता. केदारसारख्या सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सना अनेक वेळा परदेशात जावे लागते. अशा वेळी त्यांच्याकडील विविध चलनांची रक्कमही या पोर्टलच्या आधारे मॅनेज करता येणं शक्य आहे.
( http://www.manageme.in/)

या पाचही सेवा वापरण्यास अत्यंत सोप्या आहेत. आपल्याकडे भलेही स्विस बँकेत टाकावे एवढे पैसे नसतील, पण जेवढे आहेत ते तरी व्यवस्थित वापरायला शिकलं पाहिजे ना? मग वाट कशाची बघता, करा सुरवात...आजपासूनच!

2 टिपणी/ टिपण्या:

Anonymous said...

veryyyygooddd best

SHETKARI NEWS said...

या 19 जिल्ह्यात नवीन कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन कोटा उपलब्ध येथे करू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन
पहा कसे करावे आपल्या मोबाईलवर
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼🌿🌿🌿
Dofollow--https://www.shetkarinews.com/
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Post a Comment

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | cheap international voip calls